Thursday 26 November 2020

कोविड काळातील ऑस्ट्रेलियन चाचणी



चला महामारीच्या न संपणार्‍या लाटेतही क्रीडप्रेमी खासकरून सच्च्या क्रिकेटप्रेंमींसाठी तरी अखेर अतिशय आनंदाची, दिलसादायक बातमी. शुक्रवार 27 नोव्हेंबर पासून म्हणजे जवळजवळ नऊ महिन्यांच्या उपासमारीनंतर क्रिकेट ची रंगतदार मेजवानी परत सुरू होतीये. व तीदेखील क्रिकेट जगतातील सर्वोत्तम दोन संघात असे म्हणायला काहीच हरकत नाही. आता खर्‍या अर्थाने सर्वोत्तम अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट ची लज्जत चाखायला मिळणार. थोड्याशा अनाकलनीय विषाणूस उगीचच जास्ती न भिता ,त्याचा संसर्ग टाळण्याची सर्व तर्‍हेने खबरदारी घेऊन हे सामने खेळायची तयारी दाखविल्याबद्दल ऑस्ट्रेलिया व भारत दोन्ही देशांची नियामक मंडळे व अर्थातच त्यांना मंजूरी देणारी सरकारे देखील अभिनंदनास पात्र आहेत.सध्या त्यासाठी मैदानावर पन्नास टक्के प्रेक्षकांना ही उपस्थित राहुन खेळाचा आनंद लुटता येणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली – ज्याला मैदांनावरील पाठीरख्यांच्या उपस्थितीने नेहमीच प्रेरणा घ्यावीशी वाटते – त्याला ह्यामुळे निश्चितच बरे वाटले असणार. जवळपास दोन महीने चालण्यार्‍या ह्या दौर्‍यात भारतीय संघ ३ एकदिवशीय, ३ टीट्वेन्टी व ४ कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही संघांना हे सगळे दिवस सर्वांपसून वेगळे `बायो-बबल` मध्ये राहण्याची सवय करून घेणे भाग पडत आहे.

भारतीय संघ जवळपास 9 महिने खर्‍या स्पर्धात्मक क्रिकेटपासुन पुर्णपणे दूर आहे. त्यामुळे दौर्‍याची सुरुवात जरा अडखळतच होऊ शकते . त्यातच संघाचा मर्यादित षटकांच्या विश्वातील कोहिनूर म्हणता येईल असा रोहित शर्मा – फ्रांचायसि क्रिकेटच्या मोहात जरा जास्तीच वहावत गेल्यामुळे – संघा बाहेरच आहे व नंतरच्या कसोटी सामन्यातील सहभागाविषयी सुद्धा अजून तरी अनिश्चितताच आहे.सध्यातरी तो लवकरात लवकर तंदुरुस्त होऊन संघात परतेल ह्या आशेवर सगळे आहेत.कारण अलीकडच्या नवीन प्रथेनुसार विराट कोहली पालकत्वाच्या मंजुर रजेमुळे पहिल्या कसोटींनंतर संघाबरोबर नसेल. असो ह्या सगळ्या जरा नंतरच्या गोष्टी.

सध्या तरी एकदिवशीय सामन्यांचे आव्हान समोर आहे . ते घरच्या मैदानावरील अतिशय मजबुत ऑस्ट्रेलियन संघाचे – कांगारूंचे.दोन वर्षांपूर्वी आय सी सी ची निलंबांनाची शिक्षा भोगत असल्यामुळे बाहेर राहिलेले धोकेबाज वोर्नर व स्मिथ परत संघात आले आहेत. त्याबरोबरच कर्णधार म्हणुन आरोन फिंच चे ही बस्तान बर्‍यापैकी बसले आहे. कांगारूंकडे नेहमीच दर्जेदार द्रुतगती गोलंदाज असतातच.

भारतीय संघाचा विचार करता सलामीला अनुभवी शिखर धवन बरोबर तरुण व छान सुर सापडलेला शुभमन गिल की मायांक आगरवाल येतोय ते बघायचे.मधल्या फळीत विराट ला श्रेयस अय्यर (वा मनीष पांडे) ला जबाबदारी घेऊन साथ द्यावी लागेल.द्रुतगती गोलंदाजीत बूमराह व शमी बरोबर नवोदित नवदीप सैनी व शार्दुल ठाकुर मधील कोण बाजी मारते आहे ते बघु.अष्टपैलू हार्दिक पंड्या पूर्ण तंदुरस्त असल्यास पाचव्या गोलंदाजाची समस्या विशेष भेडसावणार नाही.मंदगती गोलंदाजांमध्ये रवींद्र जाडेजा बरोबर कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल पैकी एकालाच संधी मिळेल. ऋषभ पंत ला सगळेच संधी देऊन थकल्यामुळे परत एकदा कर्नाटक च्या उपकर्णधार राहुल ( सध्या के एल ) वर यष्टी रक्षणाची जबाबदारी असेल .

असो भारत जिंकावा अशी अपेक्षा बाळगतानाच ,सामने रंगतदार व्हावेत अशीच सर्वांची इच्छा असेल. चला तर मग शुक्रवार सकाळपासुन पहिल्या दिवसरात्र सामन्याच्या ह्या क्रिकेटांनंदात नहायची संधी घेऊ या . व घटकाभर तरी ह्या अदृश्य , त्रासदायक महामारीमय मनस्थितीपासुन आपली सुटका करून घेऊ या.

 ( फोटो – ईएसपीएनक्रीक इन्फो वरून )

 

No comments:

Post a Comment