Saturday 28 November 2020

कांगारूंच्या ३७४ च्या डोंगराखाली भारताचे वाघ ढेपाळले


 सामनावीर स्टिव स्मिथ ( ६६ चेंडूत ४ षटकरांसह १०५ धावा  )

अखेर - जो डर था वोही हो गया ना. कांगारूंच्या आजी व माजी कर्णधार आरोन फिंच ( ११४ ) व खास करुन स्टिव स्मिथ ( ६६ चेंडूत ४ षटकरांसह १०५ ) ह्यांची घणाघाती शतके,  सुरूवातीला वॉर्नर नंतर मॅक्सवेल नी महोत्सवी सामन्या प्रमाणे भारतीय गोलंदाजांची पिसे काढली व ६६ धावांनी आरामात विजय मिळवून कोरोना पश्चात मोसमाची झोकात सुरुवात केली . मागे वर्षभर आरोन फिंच ला अजिबात च डोके वर काढू न देणार्‍या भुवनेश्वर कुमार ची अनुपस्थिती फिंचच्या चांगलीच पथ्यावर पडली. ( आय पी एल मधीलच अजुन एक दुखापत – दुसरे  काय, सहा ऑक्टोबर पासुनच मांडीवर उपचार करतोय बिचारा ). अगदी विराट सह सर्वांनीच क्षेत्ररक्षणात केलेल्या आपल्या सारख्याच शाळकरी चुका यजमानांनीही करुन पाहुण्यांना जास्ती वाईट वाटणार नाही ह्याची काळजी घेतली .( दीड दोन तासाच्या वर कोणाला अलीकडे मैदानावर क्षेत्ररक्षण करायची सवयच नाही राहिली त्याला ते तरी काय करणार बिचारे – कारण परत तेच सर्वांनी च छान छान म्हटलेले अभूतपूर्व यशस्वी, फायदेशीर इत्यादि इत्यादि मुठभर अब्जाधीशांसाठी खेळविण्यात आलेल्या – कोंबडे खरेदी करुन –अट्टहासाने परदेशात पार पाडलेल्या क्रिकेट जत्रेतील झुंजी.) त्यामुळे एकुण सात तासाचा सामना मात्र आठ तासापेक्षा जास्ती लांबला . ३७५ चा पाठलाग करताना ४ बाद १०१ लाच निकाल स्पष्ट झाल्यावर , नंतर शिखर धवन बरोबर हार्दिक पंड्या ने शतकी भागीदारी करूनदेखील अगदी कट्टर चाहत्यांनाही सामना शेवटपर्यन्त बघणे जवळजवळ अशक्य च झाले होते.असो अनुभवी सुपर कोच रविशंकर शास्त्री, विराट कोहली व कंपनी सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन योग्य ती पावले रविवार पूर्वी उचलतीलच अशी अपेक्षा करू या.

काही ठळक गोष्टी म्हणजे अष्टपैलू हा शब्द हार्दिक पंड्या च्या बाबतीत सध्या तरी इतिहासजमा झालेला दिसतोय. पठ्याला ह्याची पुर्ण जाणीव असल्यामुळे - कारण - खरे तर विनाकारण - खास फलंदाज म्हणुन नेलेला व संधी मिळताच नेहमीच आपले नाणे खणखणीत वाजविलेला मनीष पांडे बिचारा परत बाकड्यावर हात चोळीत बसला आहे हे स्मार्ट हार्दिक ला कोणी सांगण्याची गरज नाहीये. त्यामुळे का होईना हार्दिक ने खुप छान मन लावून फलंदाजी केली व थोड्यावेळ का होईना चाहत्यांच्या आशा पल्लवित केल्या . विशेषत : लेग स्पिनर अॅडम झांपा ला कमीतकमी दोनदा तरी उत्तुंग सरळ षटकार ठोकत काही काळ का होईना गोलंदाजीतून हटवयाला भाग पाडले. नंतर ९० वर त्यानेच हार्दिक ला बाद केले ती गोष्ट वेगळी.मिचेल स्टार्कच्या पाहिल्याच आतिथ्यशील षटकातील २० धावांमुळे ४ षटकांतच भारताचे अर्धशतक फलकावर लागले. मयांकने पुढे येत एक्सट्राकव्हर वरुन जोश हेजलवुड ला खणखणीत षटकार लगावून रोमांचकारी धावांच्या पाठलागच्या आशा जगविल्या होत्या.पण मिचेल स्टार्क इतक्या वलयंकित नसलेल्या चतुर हेजलवुड ने आपल्या गोलंदाजीच्या टप्यात लगेच बदल करुन यांक आगरवाल ला तंबुत धाडले. व आखूड टप्प्याचा तोच फॉर्म्युला विराट व श्रेयस अय्यर च्या बाबतीतही वापरुन ३ बाद ८० अशी अवस्था करुन पहिल्या दहा षटकांत च  भारताच्या आव्हानातली हवा काढून घेतली . ह्यात थोडीशी काळजीची गोष्ट अशी की मयांक व विराट ने भारतीय खेळ पट्ट्यानप्रमाणे आखूड टप्प्याच्या चेंडूवर हल्ला करायच्या प्र्यत्नात आपल्या विकेट्स गमवल्या. आपल्याकडे कमरेच्या उंचीपर्यंतच आले असते ते सिडनी च्या संथ खेळपट्टीवर जवळपास छाती पर्यन्त येऊन दोघांचेही फटके चुकविले , खरे तर ह्याचे श्रेय हेजलवुड ला च द्यायला हवे . विराटला १ वर असतानाच अॅडम झांपाकडून  मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठविता आला नाही, उलट त्या जीवदानामुळेच त्याने अतिआक्रमक पवित्रा घेऊन आपली विकेट घालवली.त्याहीपेक्षा काळजीची बाब म्हणजे अलीकडे आपल्या आक्रमक खेळीने सर्वांवर छाप पाडलेल्या श्रेयस अय्यरला जोश हेजलवुड चा आखूड टप्प्याचा चेंडु अजिबातच समजला नाही. ही अपवादात्मक बाब होती की त्याचे तंत्रच कमी पडतेय ते पहावे लागेल. फॉर्मात असलेल्या के एल राहुल ही अॅडम झांपा च्या फूलटॉस वर बाद झाल्यामुळे १३.३ षटकातच भारताची अवस्था  ४ बाद १०१ अशी झाली. नंतर एका बाजुस टिकलेल्या सलामीवीर शिखर धवन  ७४ व हार्दिक पंड्याच्या ४ सुरेख षटकारांसह फटकेबाज ९० धावांमुळे , शतकी - १२८ -  धावांच्या भागीदारीने भारताला ३०० पार तरी जाता आले इतकेच.

द्रुतगती गोलंदाजीत बूमराहला अलीकडे बळींचा चांगलाच दुष्काळ जाणवत आहे . शमी ने ही पहिला बळी मिळविला पण तो २८ व्या षटकात १५६ धावांची मजबुत पायाभरणी झाल्यावरच. मागील बर्‍याच सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचे पहिल्या १० षट्कातच एक व दोन बळी मिळविणे अलीकडे चांगलेच दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे नंतर येणर्‍या तिसर्‍या गोलंदाजा चा ( सध्या नवदीप सैनी वा शार्दुल ठाकुर ) प्रभाव व प्रामुख्याने फिरकी गोलंदाजांची परिणमकरकता खूपच कमी झाली आहे.अलीकडच्या पाच सहा वर्षांपासून जगातील सर्वोत्तमाच्या तोडी चे क्षेत्ररक्षण करणारा आपला संघ परत आपल्या लौकिकाला जागेल असे वाटते.

आता परत रविवारी २९ नोव्हेंबर ला सकाळी ह्या सगळ्या उणिवांवर मात करुन भारतीय वाघ कांगारुंची शिकार साधणार काय ते बघू या.

No comments:

Post a Comment