Tuesday 1 December 2020

प्रिय स्टीव स्मिथ व समस्त कांगारू बंधुंनो,

 ह्या स्टीव स्मिथ ला तेच तेच काम पुन्हा पुन्हा करायचा कंटाळा कसा तो येत नाही ? किती एकसूरीपणा असावा ना एखाद्याच्या व्यक्तिमत्वात. तेच मैदान, तेच प्रतिस्पर्धी, फिंच व वॉर्नर च्या सौजन्याने मिळालेली डावाची शतकी पायाभरणी ही साधारण तशीच. अगदी तसेच ते पुर्ण क्रीज मध्ये नाचत बागडत, कधीही विशेष प्रेक्षणीय नसलेले ,पण नेहमीप्रमाणे संघासाठी अतिशय उपयुक्त असे ते बरोब्बर ६२ चेंडूतच फटकावलेले तसेच आक्रमक शतक. डियर स्मिथ असा तोच तोच पण फक्त कसोटी सामन्यांमध्येच शोभतो ना .आणि भारतीयांना इतके दुखावून ,सारखे सारखे असे घायाळ करून कसे चालेल रे, परवडेल का तुला ते.भाऊ परत आय पी एल खेळायचे की नाही?तुला माहीत होते ना की सध्या आमच्या मुंबईकर अंबानींचा जायबंदी रोहित शर्मा व भुवनेश्वर कुमार आधीच संघात नाहीयेत.व आम्हाला २० एक षटकांचे जास्तीतजास्त दीड एक तासच क्षेत्ररक्षण, सगळीकडून छान छान खुप लाड होणार्‍या वातावरणात खेळायचीच सवय व आवड आहे.तरी सुद्धा इतका निष्ठुरपणा? मान्य आहे की मागच्या डिसेंबर २०१८ च्या दौर्‍याच्या वेळेस वॉर्नर ची चेंडू कुरतडण्याची कल्पना व त्यायोगे भोगत असलेल्या आय सी सी च्या शिक्षेमुळे तुम्हा दोघांनाही संघाबाहेर राहावे लागले होते.पण प्रिय स्टीव स्मिथ ,आम्ही तुला इतक्या मानानी  व भरपूर ``धना``नी अगदी कर्णधार पद वगैरे देऊन कुठेही आयपीएल जत्रा भरली तरी बोलवतो ना रे. ह्या सगळ्याची थोडीफार तरी जाणीव ठेवायची नारे. कित्ती कित्ती कृतघ्नपणा हा. काय तर म्हणे आम्ही पुर्णपणे व्यायसायिक खेळाडू, मग आम्ही नाही का? आम्ही किती छान लॉकडाऊन वगैरे वेगवेगळ्या तर्‍हेने फूल टु एंजॉय करून मस्तपैकी फक्त दुबई ,शारजा वारी करून तुमच्या पाहुणचाराला आलो तर हे काय चालवले आहेस तु भलतेच. ( बघ आमचा विराट जानेवारीत परत शेवटच्या तीन  एक कसोटी सामन्यांवर पाणी सोडुन – पालकत्वाची रजा – असे भारदस्त नाव देऊन आमच्या नाजुक अनुष्का बरोबर असणार आहे ; जसे काही गावस्कर वगैर पुर्वीचे बाप व पालक म्हणुन अगदीच बेफिकीर होते ना. तरी बरं जगभर धुमाकूळ घालण्यार्‍या तेज तर्रार गोलंदाजाचा सामना त्यांनी कायम विनाहेलमेट च केल्यामुळे अजुनही जगभर त्यांना सगळेच  ``बाप माणुस`` म्हणतात. असो काळाचा महिमा, दुसरे काय , तर तो मुद्दा वेगळा, ते राहुदे ).

आता बुधवारच्या सामन्यात वॉर्नर नसणार – क्षेत्ररक्षण करताना जायबंदी वगैरे झाल्यामुळे. इथेही मला हे अजून समजत नाहीये की इतकी छान ८३ धावांची धुवांधार खेळी करून परत एकदा जवळपास दीडशे धावांची मजबुत पायभरणी करुन ३८९ धावांचा डोंगर उभा केल्यावर देखील, कोणी इतक मनापासून, जीव काढून , दुखापतीची पर्वा न करता क्षेत्ररक्षण करत असतं का . दोन चार धावा  इकडे तिकडे झाल्या तर असा काय विशेष फरक पडणार होता निकालात ? निदान प्रत्येक आयपीएल मध्ये तुला डोक्यावर घेणार्‍या कट्टर चाहत्यांचा तरी थोडाफार विचार करायचास ना रे. आमचे बघ ना इतके जगातले सर्वोत्कृष्ट ,सर्वात फीट तंदुरुस्त क्षेत्ररक्षक सुद्धा दोन पायांच्या बोगद्यातुन इतक्या धावा  सोडतात, तरीही रविदादा , ते स्वत: ,आम्ही कोणीच विशेष मनावर घेत नाही.असो तर आरोन फिंच व समस्त कांगारू बंधुनो, कृपया आम्हा सगळ्या कोट्यवधी भारतीयांना, जाहिरातदारांना, जागतिक दर्जाच्या ब्रांडेड खेळाडूंना ह्या अभुतपूर्व करोना महामारी त्रस्त वातावरणात तरी थोडाफार दिलासा मिळेल असे पहाना प्लीज . तेव्हढ ह्या तिसर्‍या व अखेरच्या सामन्यात तरी. आम्हाला परत नव्या जोमानी पिटायला अजुन टी ट्वेन्टी व झालेच तर नंतरही चार कसोटी सामने आहेतच ना. आमच्यातला वाघ जागवलात तर बघा हं, केव्हाना केव्हा यालाच ना परत आमच्या परसात , गल्लीत खेळायला.

असो तर मग समस्त आत्मनिर्भर ,आतिथ्यशील, भावनाप्रधान , टी व्ही वेड्या घरबैठया चाहत्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहचल्या असतीलच. अपेक्षा पुर्तीच्या प्रतीक्षेत आहोत. भेटु या परत बुधवार , २ डिसेंबर ला तुमच्या राजधानीत कॅनबेरा ला, तिकडे सगळं शांत आहे ना...



                                                
                                                            सामनावीर स्टिव स्मिथ 


कर्णधार आरोन फिंच

No comments:

Post a Comment