Thursday 3 December 2020

हार्दिक,जाडेजा ,शार्दुल व बुमराह च्या खेळींनी अखेर थोडी स्मितरेषा उमटवली


स्टीव स्मिथ व समस्त कांगारू बंधुंनी अखेर अतिथ्थ्यशीलता दाखविली म्हणावे की काय ? सर्वार्थाने शांत , दाट झाडी व तळ्यांनी युक्त ऑस्ट्रेलिया ची राजधानी कॅनबेरा ला झालेल्या तिसर्‍या व अंतिम सामन्यात ,हा इतका छान फुल फॉर्मातला गडी स्टीव स्मिथ ३०३ धावांचापाठलाग करतांना १ बाद ५६ अशा स्थितीत  शार्दुल ठाकुरच्या लेगला जाणार्‍या निरुपद्रवी चेंडुवर यष्टीरक्षक राहुलकडे झेल देऊन फक्त ७ धावांवर बाद झाला .मुळातच जायबंदी डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क ही संघात नव्हतेच. आपण दोन तीनदा झेल, सोपी धावबाद करण्याची भरपुर संधी देऊन देखील कर्णधार आरोन फिंच ने बाद व्हायचे प्रयत्न काही सोडले नव्हते व अखेर ७५ धावांवर २६ व्या षटकात १२३/४ वर तंबुत परतला. ह्यावेळेस मात्र २२ धावांवर स्लिप मध्ये केलेल्या मेहेरबानीची पुनरावृत्ती शिखर धवन ने धडपडत कशीतरी दुसऱया प्रयत्नात का होईना टाळली. त्यामुळे शिखरची ऑस्ट्रेलियन अर्धांगींनी फारशी नाराज नको व्हायला बिचार्‍यावर. मग यष्टीरक्षक डावखुर्‍या अलेक्स कॅरी चा प्रतिकार सोडल्यास, ग्लेन मॅक्सवेलचा च मोठा अडथळा होता. ३८ व्या षटकात ३०३ धावांचा पाठलाग करताना दबावाखाली येऊन कॅरी अखेर धावबाद झालाच. २१०/६. मॅड मॅक्स ग्लेन मॅक्सवेल नी नेहमीप्रमाणे स्पिनर जाडेजा व कुलदीप ला स्टेडीयम छतावरून बाहेर भिरकावत सामन्याची सुत्रे पुर्णपणे हातात घेतली, तेव्हा ३-० चा व्हाईट वॉश निश्चित वाटत होता. पण केवळ ३८ चेंडूत ४ षटकारांसह ५९ वर पोहचलेल्या ,नंतर कांगारू विजयासाठी  ३४ चेंडूत ३५ धावा इतके सोपे समीकरण असतानाही अति महत्वाकांक्षे मुळे म्हणा की ज्यादा आत्मविश्वास नडल्यामुळे असेल ,बुमराह च्या भेदक यॉर्कर ला कव्हर वरुन टोलावण्याचा प्रकार नडुन मॅक्सवेल ला त्रिफळाचीत व्हावे लागले. अलीकडे बळींचा दुष्काळ जाणवत असुनही जसप्रीत बुमराहने धिराने शांतपणे केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीलाही ह्याचे श्रेय द्यावेच लागेल.

तर हे सगळे असे असुनदेखील मालिका पराभवानंतर ,उशिरा का होईना झगडुन मिळवलेल्या १३ धावांच्या विजयाचे महत्व अजिबात कमी होत नाहीये . ह्या विजयाचे प्रमुख शिल्पकार अर्थातच हार्दिक पंड्या व रविंद्र जाडेजा .तसेच दौर्‍यावर प्रथमच संधी मिळालेले आक्रमक द्रुतगती गोलंदाज शार्दुल ठाकुर,नवोदित पदार्पणवीर नटराजन (सहा सामन्यांनातर भारताला पहिल्या दहा षटकांत बळी मिळवता आला ) , जसप्रीत बुमराह व अर्थातच गोलंदाजांना - मागच्या सामन्यातील अगदीच २-२ षटकांचे हफ्ते देणे अशासारख्या चुका टाळून - व्यवस्थित हाताळणारा कर्णधार विराट कोहली. बाकी विराट कडून कमीतकमी अर्धशतक तर आपण गृहितच  धरलेले असते ना. ह्यावेळेस ६३.  प्रथम फलंदाजी करतांना ५ बाद १५२ वर लागोपाठ चौथ्यांदा हेजलवूड ने विराट ला परत पाठविले तेव्हा सर्वांच्याच मनात ह्यावेळेस पण सगळ संपल्याची अशुभाची पाल चुकचुकली होतीच.पण निव्वळ फलंदाज म्हणुन खेळुन त्या कसोटीवार पुरेपुर उतरलेला हार्दिक पंड्या व गेले दोन एक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपले फलंदाजी चे नाणे खणखणीत वाजवणारा रविंद्र जाडेजा ( आठवा साक्षात धोनी लाही फिकी पाडणारी त्याची मागील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील नेत्रदीपक खेळी ) ह्या जोडीचे इरादे बुलंद होते. ३२ व्या षटकापासून शांतपणे डावाची उभारणी करत ४० व्या षटकनंतर फलंदाजीतील आक्रमणाची धार वाढवत शेवटच्या ५ षटकांत तर ह्या जोडीने अक्षरश: धुमाकुळ घातला व मुक्तपणे चौफेर चौकार,षटकारांची बरसात करत ७६  धावा लुटल्या. केवळ १०८ चेंडूत एकुण १५० धावांची अभेदय भागीदारी करून ३०२ पर्यन्त मजल मारली व त्यायोगे  संपुर्ण भारतीय संघात विजयासाठी लढण्याची ईर्ष्या निर्माण केली. अशा प्रकारे अखेर मालिका निकाल ०-३ न होऊ देता १-२ असा केला. अर्थातच त्यामुळे  एकदिवशीय सामन्यांच्या लागोपाठ पाच पराभवांमुळे अगदीच गमवलेली भारतीय संघाची  थोडीफार प्रतिष्ठा परत मिळवत उर्वरित दौर्‍यासाठी  मनोबळ उंचवलेलेच राहील हे बघितले. उर्वरित तीन टीट्वेंटी व चार कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा वाढविल्या हे मात्र नक्की.

 

 

No comments:

Post a Comment